ठाणे दि १४: रविवार १६ ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. यादिवशी सायंकाळपर्यंत ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम येथून कोणत्याही बसेस सुटणार नाहीत या ऐवजी त्या ठाणे पूर्व कोपरी स्थानकावरून सुटून ब्रिजवरून आनंदनगर व पुढे तीन हात नाका उड्डाणपुलावरून जातील.
तीन हात नाका –मल्हार सिनेमा-गोखले रोड- मूस चौक- टॉवरनाका व जिल्हाधिकारी कार्यालय हा मार्ग सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल.
नवी मुंबईकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसना शिवाजी चौक , कळवा येथे क्रीक नाक्याकडे प्रवेश बंदी राहील. या बसेस शिवाजी चौकाला वळसा घालून पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने परत जातील.
बोरीवालीकडून येणाऱ्या बसेसना तत्वज्ञान सिग्नल पासून पुढे कापुरबावडी सर्कलच्या दिशेने प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
मॉडेल चेक नाका येथून येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसना रहेजा कॉम्प्लेक्स सिग्नलपासून पुढे तीन हात नाक्याच्या दिशेने प्रवेश बंदी राहील.
वंदना बस स्थानक आणि खोपट मध्यवर्ती बस स्थानक येथील सर्व बसगाड्या खोपट सिग्नल ते कॅडबरी जंक्शन मार्गे जातील. नाशिक घोडबंदर कडून येऊन तीन हात नाक्यावरून उजवे वळण घेऊन मॉडेल चेक नाका मार्गे मुलुंड कडे जाणारी वाहनेर तीन हात नाका पुलावरून आनंदनगर कडे जाऊन यु टर्न घेऊन नाक्यावरून डावे वळण घेऊन मुलुंड कडे जातील.